Thursday, 15 August 2013

इन्शुरन्स एजंटने विचारायचे प्रश्न

एजंटने विचारावेत असे आणि आपल्याकडे त्याची उत्तरे असावीत, असे काही महत्त्वाचे प्रश्न खालीलप्रमाणे-

आपले आर्थिक लक्ष्य काय आहे?

इन्शुरन्स योजना निवडीच्या प्रक्रियेतील ही पहिली पायरी आहे. इन्शुरन्स पॉलिसी घेण्यामागे आपला कोणता फायदा किंवा हेतू आहे, हे माहीत असणे गरजेचे आहे. हे हेतू संरक्षण किंवा वित्तीय सुरक्षा, मुलांच्या शिक्षणाची तरतूद, निवृत्ती, काही मौल्यवान मालमत्तेची मालकी किंवा मुलांचे लग्न यापैकी असू शकतात.

किती खर्च करण्याची आपली इच्छा आहे?

इन्शुरन्स पॉलिसीसाठी लागणाऱ्या हप्त्याच्या रकमेचे मूल्यांकन करावे. दीर्घकालासाठी खिशाला परवडणारा आणि इन्शुरन्स पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत नेटाने व नियमित भरता येईल, अशा हप्त्याच्या रक्कमेची निश्चिती करण्याचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा.

किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे?

गुंतवणुकीचा कालावधी आपल्या आर्थिक लक्ष्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हप्त्याची रक्कम निर्धारीत करताना गुंतवणूक आणि तिचा कालावधी विचारात घ्यावा लागतो. हप्त्याची रक्कम काळजीपूर्वक ठरवावी, कारण इन्शुरन्स पॉलिसीच्या पूर्ण कालावधीत आपण हप्ता भरू शकलो तरच त्याचा कमाल फायदा होतो. काही योजनांत, काही कालावधीसाठीच हप्ता भरण्याची आवश्यकता असते. त्यामुळे असे पर्याय माहीत करून घ्यावेत.

किती जोखीम पत्करण्याची तयारी आहे?

गुंतवणुकीपासून कमाल परतावा मिळवण्याच्या दृष्टीने जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गुंतवणुकीचे मूलभूत तत्त्व म्हणजे- उच्च जोखीम आणि उच्च परतावा. त्यामुळे तुम्हाला युनिट-लिंक्ड योजना फायदेशीर ठरेल की पारंपरिक योजना, हे ठरवण्यासाठी जोखीम पत्करण्याची आपली क्षमता ठरवावी लागेल. युनिट लिंक्ड योजनेत आपण निवडलेल्या फंडाच्या कामगिरीवर आपले परतावे अवलंबून असतात, तर पारंपरिक योजनेत परतावे सुरक्षित आणि वेळेला त्यांची आधीच निश्चिती केलेली असते.
जोखीम पत्करण्याची क्षमता व्यक्तिपरत्वे बदलत असल्यामुळे आपली ही क्षमता जाणून घेण्यासाठी खालील बाबींचा विचार करावा-

वय आणि आयुष्याचा टप्पा: कमी अवलंबित्व, सुरक्षित उपजीविका आणि कमावण्यासाठी पुढे असलेले मोठे आयुष्य यामुळे तरुण वयात अधिक धोका स्वीकारण्याची प्रवृत्ती आढळते.

मालमत्तेची मालकी: एखाद्याकडे मोठ्या मालमत्तेची मालकी असेल आणि जबाबदारी कमी असेल म्हणजेच ' उच्च निव्वळ नफा '. त्यामुळे बाजारातील चढ-उतारांमुळे अल्पकालीन नुकसान झाले तरी उच्च मालमत्तेमुळे त्याचे संरक्षण होते आणि अधिक धोका पत्करण्याची तयारी असते.

गुंतवणुकीचा अनुभव: वित्तीय बाजारातील गुंतवणुकीचा पूर्वानुभव आणि ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेचा, दीर्घकालात कसा परिणाम होतो, याची जाण असते, त्यामुळे ते अधिक जोखीम पत्करू शकतात.

इन्शुरन्स पॉलिसी आपण किती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो?

आपण इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती अधिक उत्तम प्रकारे समजून घेण्याची खात्री करून घ्यावी. त्यामुळे खालील बाबींबाबत जागरूक असल्याची हमी बाळगावी.

दुर्दैवाने मृत्यू झाला तर आपण निश्चित केलेल्या वित्तीय लक्ष्यांची पूर्तता इन्शुरन्स पॉलिसी करते का?

हप्ताफेडीची पद्धत कोणती? ती एकहप्ता पॉलिसी आहे की नियमित हप्ता पॉलिसी? हफ्ता फेडीच्या कालावधीचीही विचार करावा.

पॉलिसचा कालावधी, परिपक्वतेचे फायदे आणि पॉलिसी शरण केल्यास होणारे फायदेही जाणून घ्या.
पॉलिसीच्या कालावधीत काही पॉलिसी, पॉलिसीधारकांना बोनसही देतात. त्यामुळे पॉलिसी आणि कंपनीचा बोनस देण्याबाबतचा इतिहासही तपासून पाहावा.

सर्वात महत्त्वाचे, ज्याच्याकडून विमा उतरवून घेत आहोत तो विश्वसनीय असल्याची खात्री करून घ्यावी. एजंट विश्वासू सल्लागार असला तरी त्याची थोडीशी पार्श्वभूमीही स्वत:हून जाणून घ्यावी. एजंटचा खरेपणा पडताळण्यासाठी त्याच्याकडे आयडी कार्डची मागणी करावी. त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनीसंबंधी महत्त्वाच्या बाबी- कंपनीची वित्तीय स्थिती, तिच्या फंडाची कामगिरी, ठराविक काळात आणि सोपेपणाने विमाचे दावे निकालात काढण्याच्या पद्धती, ग्राहक सेवा, आणि कंपनींचे शाखांचे जाळे, या बाबींचीही चाचपणी करा. एजंटला विचारून, कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा दुसऱ्या ग्राहकांकडे चौकशी करूनही कंपनीसंबंधीच्या वरील बाबींची पडताळणी करता येते.
(ए. एस. नारायणन, चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर, बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स)
..........................................
लाइफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेताना मनात अनेक शंका आणि प्रश्न उत्पन्न होतात. इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी या शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे. आपल्या गरजांना योग्य ठरणारी सर्वोत्तम पॉलिसी निवडून देण्यासाठी इन्शुरन्स एजंट सेवेसाठी हजर असतो. इन्शुरन्स निवडताना आपण अचूक निर्णय घेत असल्याची खात्री करण्यासाठी काही अत्यावश्यक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एजंटची तुम्हाला मदत होत आहे, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते.


gopal  9820755753

No comments:

Post a Comment