Monday, 8 October 2018

पॉझिटिव्ह थिंकिंग नेमके कसे करावे?

पॉझिटिव्ह थिंकिंग नेमके कसे करावे?

पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी यशस्वी, सुखी व आनंदी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचारांपासून दूर रहा, असे सांगितले जाते. हे सांगणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष अमलात आणणे तितकेसे सोपे नाही. माझ्या प्रत्येक कार्यशाळेत अनेकजण मला विचारतात, ‘पॉझिटिव्ह थिंकिंग नेमके कसे करावे?’ या पद्धतीत नेमकेपणा आणण्यासाठी मी काही exercise युक्त्या, कृती तयार केल्या आहेत.

आपण जेव्हा नकारात्मक असतो तेव्हा आपले बोलणे, स्वतःशी बोलणे कसे असते ते बारकाईने पहा. जेव्हा आपण वैतागतो, तेव्हा बोलून जातो, ‘जाऊदे, मरूदे तिकडे...’ एकाद्या वेळेला असे म्हणणे वेगळे. पण रोज दहा वेळा तुम्ही असे म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. ही सवय मोडणे, म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रयत्न करणे. सवय लगेच मोडेल असे नव्हे, पण प्रयत्न तरी करून पहा. जो वैतागल्यावर शांत रहातो, तो आपोआपच पॉझिटिव्ह थिंकिंग करतो.

एखादी अवघड कामगिरी तुमच्यावर सोपविली गेली तर मनावर ताण येतो. अशावेळी स्वतःशी बोलणे कसे असते पहा. ‘हे मला कसे जमणार?’ असे म्हणत बसला तर कधीच जमणार नाही. त्याऐवजी ‘हे माझ्यासाठी एक आव्हान आहे, मी ते पूर्ण करणारच आणि शाबासकी मिळविणार’, असे जाणीवपूर्वक मनाशी म्हणा. ‘जाणीवपूर्वक’ म्हणणे महत्त्वाचे आहे. ही पॉझिटिव्ह थिंकिंगची सुरवात होय. असे तुम्ही नेहमी करू लागला की, ‘हे मला कसे जमणार?’, हे वाक्य तुम्ही विसरून जाल.

आपल्याकडे वेळ कमी असेत तर आपण ‘वेळ नाही, वेळ नाही’, म्हणत बसतो. त्याऐवजी कामांचा प्राधान्यक्रम (priority) ठरविण्याचे बोलणे स्वतःशी करावे. म्हणजे उपलब्ध वेळेत शक्य होतील ती कामे नीटपणे होतील.

तर मित्रहो, ही युक्ती तुमच्या लक्षात आली असेलच. स्वतःशी बोलताना तुम्ही काय बोलता ते बारकाईने पहा. नेहमी सकारात्मक दिशेने बोला. नकारात्मक विचार मनात आले तरी सकारात्मक दिशेने बोला. हळूहळू तुम्हाला जाणवेल की नकारात्मक विचार कमी होत आहेत. पॉझिटिव्ह थिंकिंगच्या दिशेने तुमची वाटचाल होत आहे. अशा अनेक युक्त्या व exercise मी वेळोवेळी सांगणार आहे.

डॉ. आशिष गुरव (मोटिव्हेशनल स्पीकर व लाईफ कोच)

No comments:

Post a Comment