Tuesday, 7 March 2023

संथा म्हणजे काय?

 वेदाध्ययन किती कठीण आहे याची तथाकथित सुशिक्षित समाजाला पण फारशी कल्पना नसते.  त्याची जराशी तोंड ओळख करून देणारा हा सुंदर लेख . 


लेखक माहीत नाही। 


Source Whatsapp


=========================================


संथा म्हणजे काय?

================================

 संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी- समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण) पाडून ,आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. 


एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.

१) चरणाची संथा 

२) अर्धनीची संथा

३) ऋचेची संथा 

४) गुंडिकेची संथा


१) चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी (पोथित बघून) तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात 

शुद्धअक्षर,

जोडाक्षर,

त्याचे गुरुत्व,

अनुस्वारांचे उच्चार, 

स्वराघात,र्हस्व

आणि दीर्घ/प्रदीर्घ-असे विसर्ग (आणि त्यांचे तसेच उच्चार) ,

हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले

पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं...ही झाली "चरणाची" पहिली संथा .


अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते.

(कारण तेच-मंत्रात अशुद्धी राहू नये.)


२) अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. आधी चरण-डोक्यात-

बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर-नसले,तरी चालते. तर..ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला...की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.


३) ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण (धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण-घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) यातल्या या (पहिल्या) संथेवर, शिकविणार्या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः-अशुद्धी आली कींवा तयार झालेली आहे

काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.


४) गुंडीकेची संथा..हा शेवटचा परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम- केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा..


अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्या किंवा तिसर्या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी- नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-

पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर

१६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.


आवृत्ती:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय्/ध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत -ठेवावा लागतो. नाहितर

आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो.  आणि असंही हे सोप काम नसतच.


नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन

वर्षानी बॅलन्स होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष (फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/ निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत जिवंत

ठेवत अध्ययन करावे लागते.. एका वेदाच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास इथून सुरवात

होऊन..शेवटच्या वर्षाला हा कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी १२ वर्षे आहे. पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार

जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय?

तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते?


तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून

वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात

सुमारे आडिचशे संचार आहेत. 

बरं हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय?

आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? 

तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत (विशिष्ट शब्दावर) मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच (विशिष्ट शब्दावर) (आता)

मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा एके ठिकाणी "शुंभमान ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे ,"शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्या प्रकाराला म्हणतात:- संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. 

सुदुघाहि-पयस्वती: आणि

सुदुघाहि-घृतःश्चुतः हा शब्दाचा संचार

झाला...हा ही सहज लक्षात रहातो. पण

अनुस्वारांचे संचार

म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं

बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं

लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा -

पवतामांतरिक्षा आणि

पवंतामांतरिक्षा -

या शब्दातल्या दुसर्या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे.

मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना... रोज २ अथवा ३ संचार- जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज

ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि

काही नाही! 


आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातलाहा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..,ते पहा...!

नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु रघोरा पापकाशिनी।


आणि पुढची (वेगळी)ओळः-

तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥


आता इथून सरळ

नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु: शिवाविश्वा हभेषजी।


आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥


आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ

ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार!


आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही संचार जाणार!


आणि कित्तीही कुशाग्र

बुद्धिमत्तेचा माणूस असला ,तरी संपूर्ण एका वेदातले हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम..मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडव आलं

तरी त्याला नीट उभं करता येतं.(याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! )


 अर्थात,

ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता,त्या अतीप्राचीन

(लेखनकलेची सुरवातही न झालेल्या)कालखंडात अश्या तर्हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं,

हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगत म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि (या)पुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो. आज या निमित्तानी हा (पाठांतराचा)

छोटासा आढावा घेणारा लेख लिहून झाला याचं समाधान दोन कारणांनी आहे.


वेदाध्यायी विप्र जनास नमन।